नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चर्चच्या फादरसह अन्य दोघांवर टोळक्याने हल्ला केल्याची घटना जत्रा हॉटेल भागातील समर्थनगर येथे घडली. या घटनेत दोघांना फायबरच्या दांडक्याने मारहाण करीत एकावर तलवारीने वार करण्यात आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईमानुएल रॉबर्ट अँथनी (३० रा. सेंट थॉमस चर्च शिवाजीरोड, शालीमार) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अॅथोनी शनिवारी (दि.३०) रात्री जत्रा हॉटेल परिसरातील समर्थनगर भागात फादर फ्रॉकलिन अनुप यांच्या घरी जात होते. अनुप यांच्या घराकडे ते पायी जात असतांना दोघा तरूणांनी त्यांना गाठले. कुठले ही कारण नसतांना एकाने त्याच्या हातातील फायबरच्या दांडक्याने अॅथनी यांना मारहाण केली. तर दुसरा हातातील तलवार घेवून त्यांच्या अंगावर धावून आला.
अचानक झालेल्या या हल्यामुळे भेदरलेल्या अॅथनी यांनी आरडाओरड केली असता फादर अनुप व अॅलेन कॉर्नल त्यांच्या बचावासाठी धावून आले असता ही घटना घडली. संतप्त चार जणांच्या टोळक्याने फादर अनुप व अॅलेन कॉनेल यांनाही फायबर दांडक्याने मारहाण करीत कॉनेल याच्या डाव्यावर तलवारीने वार केले. या घटनेत कॉनेल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास हवालदार बहिरम करीत आहेत.