नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर परिसरात घरफोडीची मालिका सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे चार लाखाचा ऐवज लंपास केला. त्यात एक मंदिरही चोरट्यांनी फोडले. याप्रकरणी पंचवटी, गंगापूर व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अमृतधाम परिसरातील संगिता ज्ञानेश्वर जाधव (रा.संत साहेब बंगला,साईबाबा मंदिराजवळ,साईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जाधव कुटुंबिय ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोकडसह महत्वाचे कागदपत्र असा सुमारे ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार संतोष कोरडे करीत आहेत.
दुसरी घटना शरणपूररोड भागात घडली. याबाबत मनिष जिवनलाल मोदी (रा.सुमती सोसा.शरणपूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. मोदी यांच्या सोसायटी आवारात असलेले कुंथूनाथ जैन मंदिर फोडून चोरट्यांनी सुमारे २ लाख २५ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना दि.४ ते ७ सप्टेंबर दरम्यान घडली. मंदिरातील चांदीच्या व पंचधातूच्या मुर्ती,पुजेची पंचधातूची भांडी व दानपेटीतील रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक टिपरे करीत आहेत.
तिसरी घटना गंगापूररोडवरील जेहान सर्कल भागात घडली. बांधकाम व्यावसायीक विश्वकुमार रामदास सोनवणी (रा.झेनित अपा.गंगापूर पोलीस स्टेशनजवळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवणी यांचे महानगर बँक मागील उदयनगर भागात स्वामी डेव्हलपर्स नावाचे कार्यालय आहे. अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (दि.८) रात्री ऑफिसचा मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ही चोरी केली. कार्यालयात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटात ठेवलेली १ लाख २० हजाराची रोकड, दोन पेनड्राईव्ह तसेच महत्वाचे कागदपत्र असा १ लाख २० हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.