नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील लेखानगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात दीड लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वंदना रविंद्र बारटक्के (६१ रा.द्वारकामाई बंगला,सुंदरबन कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बारटक्के कुटूंबिय शनिवारी (दि.७) दुपारी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद बंगल्याचे कुलूप तोडून हॉल मधील व बेडरूमधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
पिस्तूल घेवून फिरणा-या परप्रांतीयास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मालधक्कारोड भागात पिस्तूल घेवून फिरणा-या परप्रांतीयास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून काडतुसांनी भरलेल्या गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू रामशिव (२५ रा.खजूरी जि.मिर्झापूर,उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पिस्तूलधारीचे नाव आहे. मालधक्कारोडवरील सिमेंट गोडावून भागात असलेल्या तरूणाकडे पिस्तूल असल्याची माहिती नाशिकरोड पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.८) सायंकाळी पथकाने धाव घेत संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे काडतुसांनी भरलेला गावठी पिस्तूल मिळून आला. या कारवाईत पिस्तूलसह काडतुसे असा सुमारे ३६ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंमलदार गोकूळ कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गोसावी करीत आहेत.