नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– तपोवन परिसरातील जयशंकर फेस्टीवल लॉन्स भागात मुलाच्या लग्नात वरमाईची पर्स चोरट्यांनी हातोहात लांबविली. या घटनेत सुमारे १ लाख ३५ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे अडीच लाखाच्या ऐवजावर चोरट्यानी डल्ला मारला असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलाने पर्स पळविल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये आढळून आले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
लता नामदेव जायभावे (५० रा. जाचकनगर,जयभवानीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जाचक यांच्या मुलाचा शनिवारी (दि.१) रात्री गोरस मुहूर्तावर विवाह होता. तपोवनातील जयशंकर फेस्टीवल लॉन्स येथे हा विवाह सोहळा पार पडला. धार्मिक विधी आणि जेवणावळी आटोपताच मध्यरात्री पर्यंत पाहूणे मंडळीसह वºहाडी मंडळीचे फोटो शेषण सुरू असतांना ही चोरी झाली. वधू वरांसमवेत छायाचित्र काढण्याची लगभग सुरू असतांना वरमाई असलेल्या लता जायभावे यांनाही स्टेजवर पाचारण करण्यात आले. पाहूणे मंडळी बरोबर जायभावे कुटूंबिय छायाचित्र काढण्यात मग्न असतांना लताबाई यांनी स्टेजवरील सोफ्यावर ठेवलेली पर्स चोरट्यांनी हातोहात लांबविली. या पर्समध्ये नातेवाईकानी भेट म्हणून दिलेली सुमारे १ लाख ३५ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ४७ हजार ७१७ रूपयांचा ऐवज होता. ही बाब लक्षात येताच जायभावे कुटूंबियांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार सुरजे करीत आहेत.