नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जास्त परताव्याचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील एका वृध्दास ३६ लाखास गंडविले आहे. काही रकमेचा परतावा देत विश्वास संपादन करून या घटनेत मोठी गुंतवणुक करण्यास भाग पाडण्यात आले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलका गोरे ( रा. बर्डेनगर, आडगाव नाका) व हिरामण भामरे ( रा. समर्थनगर, इंदिरानगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत अरुण हरी शिंपी (७२ रा. गजानन दर्शन सोसा.पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे यांच्याशी गेल्या वर्षी भामट्यांनी संपर्क साधला होता. यावेळी अल्पावधीच्या गुंतवणुकीतून जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखविण्यात आले.
शिंपी यांचा विश्वास संपादन करीत भामट्यांनी काही रक्कम गुंतवणुक करण्यास भाग पाडले. यानंतर चार लाखाचा परतावाही त्यांनी केला मात्र नंतरच्या लाखोंच्या गुंतवणुकीतील रकमेचा अपहार केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून यात ३६ लाख रूपयांची फसवणुक करण्यात आली आहे. तगादा लावूनगी गुंतवणुक व नफा रक्कम पदरात न पडल्याने शिंपी यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.