नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गुन्हा करण्याच्या पध्दतीवरून ग्रामिण पोलीसांनी शहरातील एका अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्याने बा-हे ता.सुरगाणा येथील धाडसी घरफोडीची कबुली दिली आहे. संशयिताच्या ताब्यातून पावणे रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६ लाख ९२ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या चोरट्यांच्या अटकेने ग्रामिण भागातील अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे.
अरूण अंकुश दाभाडे (५२ रा.कोळीवाडा,साईनाथनगर नांदूरनाका) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याविरूध्द शहरातील भद्रकाली,नाशिकरोड,पंचवटी तसेच पिंपळगाव, कळवण,इगतपुरी व सुरगाणा पोलीस ठाण्यात घरफोडीचे व अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या रविवारी (दि.१०) बाºहे ता.सुरगाणा येथे धाडसी घरफोडी झाली होती. सुनिल राऊत यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा उघडून चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातील व देवघरातील सुमारे १३ लाख ७६ हजार ७७५ रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याबाबत बा-हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आल्याने बा-हे पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाका कामाला लागली होती. एलसीबीचे निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली या घरफोडीचा उलगडा करण्यात आला. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत चोरी करण्याची पध्दत आणि तांत्रीक पुराव्याच्या आधारे संशयिताच्या नांदूरनाका भागात मुसक्या आवळल्या असता त्याने धाडसी घरफोडीची कबुली दिली.
संशयिताच्या ताब्यातून २ लाख ८० हजार ६३५ रूपयांची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६ लाख ९२ हजार ४१० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित सराईत गुन्हेगार असून त्याच्या अटकेने ग्रामिण भागातील अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांच्या माार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक किशोर जोशी,संदेश पवार तसेच बाºहे येथील सहाय्यक निरीक्षक सोपान राखोंडे एलसीबीचे जमादार शिवाजी ठोबरे,नवनाथ सानप,हवालदार किशोर खराटे,सचिन देसले,सुधाकर बागुल, प्रशांत पाटील,संदिप नागपुरे,हेमंत गिलबिले,प्रदिप बहिरम,विनोद टिळे,हेमंत गरूड,मनोज सानप,योगिता काकड,ललिता शिरसाठ,अमोल गांगुर्डे,शैलेश गांगुर्डे,कुणाल वैष्णव,तृप्ती पवार,प्राजक्ता सोनवणे आदींच्या पथकाने केली.