नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्त्याने पायी जाणा-या अल्पवयीन मुलीची वाट अडवित एकाने विनयभंग केल्याची घटना पेठरोड भागात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दानिश नाजिर कुरेशी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडीती मंगळवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास परिसरातील टेलरच्या दुकानात कपडे घेण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. संशयिताने मुलीची वाट अडवित मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणत तिचा विनयभंग केला.
यावेळी मुलीने त्यास वाट सोड असा सज्जड दिल्याने संशयिताने तिला शिवीगाळ करीत तुझ्याकडे बधतो असा दम दिला. अधिक तपास उपनिरीक्षक गावीत करीत आहेत.
घरफोडीत ४५ हजाराच्या ऐवजावर डल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लामखेडे मळा भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४५ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह घरातील संसारोपयोगी वस्तू आणि साड्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधाकर गोपाळा दिक्षीत (रा.सप्तशृंगीनगर, लामखेडेमळा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दिक्षीत कुटूंबिय २३ जुलै रोजी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या टेरेसवरील दरवाजा उघडून ही घरफोडी केली असून भामट्यांनी कपाटात ठेवलेली २५ हजाराची रोकड तसेच तांब्या पितळाचे भांडी महागड्या साड्या व घड्याळ असा सुमारे ४५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार मळवाळ करीत आहेत.
……..