नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद पेठरोड लिंक रोडवरील पाटालगत शनिवारी (दि. २१) एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. या खुनाचा उलगडा पंचवटी पोलिसांनी केला असून २ अल्पवयीन मुलांकडून हा खून केल्याची धक्कादायक बाब तपासात उघडकीस आली आहे. तरुणाला दगडाने ठेचून हा खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला होता. पोलिसांनी आपली चक्र फिरवत २ दिवसांत या खुनाचा उलगडा केला असून खुनाचे धक्कादायक कारण समोर आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी २ अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून ऋषिकेश दिनकर भालेराव (वय 19, रा. धर्माजी कॉलनी, सातपूर) या तरुणाचा झाला असून शुल्लक कारणावरून याचा दोन अल्पवयीन मुलांनी हा खून केला आहे. ऋषिकेश हा कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कामाला होता. त्याला विविध प्रकारचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी, ऋषिकेश याने दोन अनोळखी अल्पवयीन मुलांकडून लिफ्ट मागितली, त्या मुलांनी ऋषिकेशला लिफ्ट दिली, दरम्यान, ऋषिकेशने त्यांच्याकडून दारूसाठी पैसे मागितले. यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.
या दोघा अल्पवयीन मुलांनी ऋषिकेशच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. हे अल्पवयीन मुले महाविद्यालयीन विद्यार्थी असून ते पंचवटी परिसरात राहतात. या खुनाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पंचवटी पोलिसांसमोर होते. वरिष्ठ निरिक्षक डाॅ. सिताराम कोल्हे, निरिक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला आहे.
दरम्यान, मागील १५ दिवसांमधील हा तिसरा खून असून नाशकात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शहरात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात दिवसा-ढवळ्या गुन्हे घडत आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्था नीट राहण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. मात्र गुन्हेगारांना पोलिसांचा वचक नसल्याचे या वाढत्या गुन्ह्यांच्या प्रमाणामुळे स्पष्ट होत आहे.
Nashik Crime Murder police Investigation