नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड औद्योगिक वसाहतीतील रोहिणी इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक योगेश मोगरे यांच्या खूनाचा उलगडा करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. केवळ चार चाकी पळवण्याच्या उद्देशातून हा निर्घृण खून करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. मॉलमध्ये खरेदी केलेल्या कपडे खरेदीच्या आधारे अल्पवयीन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या खूनाचा मास्टरमाईंड अद्याप फरार असून त्याच्या शोधार्थ गुन्हे शाखेचे पथक हरियाणा राज्यात तळ ठोकून आहे. लवकरच मुख्य संशयित पोलिसांच्या हाती लागेल असा विश्वास पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
अंबड औद्योगीक वसाहतीतील रोहिणी इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक योगेश मोगरे हे गेल्या गुरूवारी (दि.२३) कंपनीतील कामकाज आटोपून सायंकाळी घराकडे जात असतांना ही घटना घडली होती. महामार्गाच्या सर्व्हीसरोडवरील आंगण हॉटेल भागातील एका पानस्टॉल नजीक ते सिगारेट ओढत असतांना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.
हल्लेखोरांनी त्यांची किया कार एमएच १५ एचवाय ४९५९ पळवून नेली होती. मोगरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अचानक झालेल्या या हल्याचे कुठलेही धागेदोरे नसल्याने या गुन्हाची उकल करण्याचे आवाहन पोलीसांसमोर होते. त्यामुळे हा तपास शहर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.
गुन्हे शाखेचे सहा पथके आरोपींच्या मागावर असतांनाच दुस-या दिवशी हल्लेखोरांनी पळविलेली कार बेलगांव कुºहे शिवारात मिळून आली. तर कार पासून काही अंतरावर एक रक्ताने माखलेला शर्टही मिळून आला होता. सर्व बाजूनी पोलिस शोध सुरू असतांना साक्षीदाराने सांगितलेल्या वर्णना प्रमाणे सर्व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
पथकांनी वेळोवेळी घटनास्थळ आणि बेवारस सोडलेल्या कारचा परिसर पिंजून काढला असता पोलिसांच्या हाती एक कॅरीबॅग लागली. या बॅगमध्ये नवी कोरी पॅण्ट मिळून आल्याने या घटनेचा उलगडा झाला. तपासात वारंवार घटनास्थळावर भेट देत पथकाने काही माहिती गोळा केली. कपडे खरेदी वरून पोलिसांनी थेट परिसरातील व मुंबई मधील नामांकित मॉलसह रेल्वेस्टशन पिंजून काढत सीसीटिव्ही फुटेज प्राप्त केले.
गाडीची चावी देण्यास प्रतिकार केल्याने चाकुने हल्ला
कपडे खरेदी बिलावरील मोबाईल नंबरच्या आधारे संशयितांचे मुंबई ते नाशिक कनेक्शन उघड झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. या भौतिक पुराव्याच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हरियाणा येथील असल्याचे तपासात समोर आले. तपासी पथकाने हरियाणा गाठून अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले असून त्याने अजितसिंग सत्यवान लठवाल (रा. चुडाणा.हरियाणा) या साथीदाराच्या मदतीने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.
दोघा संशयितांसह त्यांचा एक मित्र १५ मार्च रोजी मुंबई येथे आले होते. त्यातील एक जण मौजमजा करून दुस-या दिवशी माघारी गावी परतला तर या दोघांनी मुंबईत एखाद्या श्रीमंताचे खंडणीसाठी अपहरण करण्याचे ठरविले. स्व:ताच्या बचावासाठी दोघांनी चाकू आणि कपडेही खरेदी केले.
आठ दिवस मुंबईत तळ ठोकूनही त्यांना चारचाकी चोरता न आल्याने त्यांनी २३ मार्च रोजी नाशिक गाठले. गाडी चोरण्याच्या उद्देशाने हा गुन्हा केल्याची कबुली संशियताने दिली असून, मोगरे यानी गाडीची चावी देण्यास प्रतिकार केल्याने त्याच्यावर चाकुने हल्ला चढवला असल्याचे उपायुक्त बच्छाव यांनी स्पष्ट केले. अधिक तपास निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोपट कारवाळ,हवालदार प्रशांत वालझाडे,सुनिल आहेर,संदिप रामराजे व राहूल पालखेडे आदींचे पथक करीत आहेत.
Nashik Crime Murder Manager Investigation Police