नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आईला बेशुध्द करत अवघ्या चार महिन्याच्या चिमुलकलीचा गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेने नाशिकमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. सातपूर येथील ध्रुव नगर येथे एका अज्ञात महिलेने घरात शिरून हे कृत्य केले. ही हत्या का करण्यात आली याबद्दल वेगवेगळे तर्क काढले जात आहे. या हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी २० मार्च रोजीच्या रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. ध्रुव नगर येथे भुषण यशवंत रोकडे व युक्ता भुषण रोकडे यांच्यासह त्यांचे कुटुंबिय राहतात. युक्ता रोकडे घरी एकट्या असतांना एक अज्ञात महिला घरात आली. त्यानंतर तिने विचारपुस करण्याचा बहाणा करत युक्ता यांच्या नाकाला रूमाल लावला. या रुमालावर कुठलेतरी औषध टाकण्यात आले होते. त्यामुळे युक्ता या बेशुध्द झाल्या. युक्ता बेशुध्द झाल्याची खात्री या महिलेने केली. त्यानंतर तिने घरात असलेल्या चार महिन्याची बालिका दुर्गुशी हिच्याकडे मोर्चा वळविला. या अज्ञात क्रूर महिलेने चिमुरड्या दुर्गुशीची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर ही महिला तत्काळ फरार झाली.
काही वेळाने युक्ता यांच्या सासूबाई घरात आल्या. त्या दूध घेण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या. घरात येताच त्यांनी पाहिले की, सून युक्ता या बेशुद्ध अवस्थेत आहेत. तर, चार महिन्यांची दुर्गुशी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. त्यांनी जोरदार हंबरडा फोडला आणि आरडाओरडा केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी रोकडे यांच्या घराकडे धाव घेतली. शेजाऱ्यांनी तातडीने भुषण रोकडे यांना व पोलिसांना फोन केला. हे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. हा सर्व प्रकार पाहून पोलिसही थक्क झाले.
युक्ता यांनी सर्व प्रकार पोलिसांकडे कथन केला आहे, ही महिला पंजाबी ड्रेस घालून आली असल्याचे सांगितले. याप्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सदर घटनेचा तपास गंगापूर पोलिस करत आहेत. दरम्यान, अवघ्या ४ महिन्यांच्या चिमुरडीची घरात घुसून हत्या करण्यात आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Nashik Crime Murder 4 Month Old Girl at Home