नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हात उसनवार पैसे घेण्या-देण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. मात्र, हे उसनवार पैसे चुकते न केल्यास काय होते याचा प्रत्यय एका प्रकरणात आला आहे. सातपूर परिसरातील रहिवासी असलेले शेखर रघुनाथ दशपुते आणि नाना धोंडू कोठावदे यांचे एकमेकाशी चांगले संबंध असल्यामुळे सहाजिकच ते उसनवार पैसे देत-घेत होते. मात्र, दशपुते यांनी दिलेले साडेचार लाख रुपये कोठावदे यांनी परत केले नाहीत. अखेर दशपुते यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि अखेर न्यायालयाने कोठावदे यांना शिक्षा सुनावली आहे.
दशपुते यांचे वकील अॅड डी आर विधाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, दशपुते यांनी कोठावदे यांना २०१५ मध्ये साडेचार लाख रुपये हात उसनवार दिले होते. मात्र, विहित वेळेत कोठावदे यांनी ते परत केले नाहीत. त्यानंतर देशपुते यांनी त्यासाठी तगादा लावला. अखेर कोठावदे यांनी दशपुते यांना सेंट्रल बँकेचा साडेचार लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, हा धनादेश बँकेत वटला नाही. तो परत आला. ही बाब दशपुते यांनी कोठावदे यांच्या निदर्शनास आणून दिली पण कोठावदे यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. शिवाय पैसे परत देण्याबाबतही काहीच केले नाही. अखेर दशपुते यांनी कोठावदे यांना रितसर कायदेशीर नोटीस पाठवली. त्याचीही दखल कोठावदे यांनी घेतली नाही. अखेर याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल झाला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. त्यानुसार, कोठावदे यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तसेच, कोठावदे यांनी साडेचार लाख रुपये एक महिन्याच्या आत दशपुते यांना द्यावे. तसेच, ही रक्कम देण्यास असमर्थ असल्यास १ महिना सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी. तसेच, तक्रारकर्त्याला झालेल्या त्रासापोटी ५ हजार रुपये द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.