नाशिक – पाहूण्या म्हणून आलेल्या महिलेस घरात घुसून एकाने मारहाण करीत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना मखमलाबाद रोड भागात घडली आहे. या घटनेत सख्या बहिणी जखमी झाल्या असून घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती गौड (५५) आणि सुशिला गौड (६५) अशी भाजलेल्या महिलांची नावे आहेत. प्रदीप ओमप्रकाश गौड हे शिंदे नगर भागातील भाविक बिलाजियो या इमारतीत आपल्या कुटूंबासह राहतात. मंगळवारी (१० ऑगस्ट) सकाळच्या सुमारास गौड यांच्या मावशी भारती या त्यांच्या घरी आल्या. दोघी बहिणी आपले वयोवृद्ध वडील जानकीदास गौड यांच्याशी गप्पा मारत होते. त्याचवेळी दुपारी बारा वाजेच्या सुमारास रिक्षाचालक कुमावत तेथे अचानकपणे आला. कुमावत हा गौड कुटुंबाचा परिचीत आहे. त्याने मावशी भारती गौड यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी संतप्त झालेल्या कुमावत याने काही कळण्याच्या आत बाटलीत आणलेले पेट्रोल भारती गौड यांच्या अंगावर ओतले. तसेच, त्यांना पेटवून देत पोबारा केला. या घटनेत सुशिला गौड याही आपल्या बहिणीस वाचविण्याच्या प्रयत्नात भाजल्या आहेत. वयोवृध्द वडील जानकीदास गौड, पार्थ गौड (१५) व चिराग गौड (३) ही बालके बालंबाल बचावली आहेत. चिमुकल्या पार्थ गौड याने वेळीच बेडरूममध्ये धाव घेत आपल्या आई-वडिलांशी संपर्क साधल्याने ही घटना समोर आली आहे. या घटनेत घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे. पंचवटी पोलीस आणि अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला आहे. वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सिसिटीव्हीच्या आधारे संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.