नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कॉलेजरोड येथे अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेकअप सलून क्लास संचालकाने विवाहितेवर बलात्कार केला आहे. तसेच, तिचे अश्लिल व्हिडिओ आणि फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत सदर विवाहितेवर वारंवार अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहितेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, मेकअप क्लासच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे.
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजरोडवरील आर्चिस गॅलरीच्या मागे असलेल्या पराग अपार्टमेंटच्या तळमजल्यावर सलून आणि मेकअप क्लास आहे. याठिकाणी एक विवाहिता कामानिमित्त आली. क्लासचा संचालक ललिक निकम याने सदर विवाहितेला कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर सलूनमध्येच या विवाहितेवर बलात्कार करण्यात आला. याचवेळी या विवाहितेचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले. हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या विवाहितेवर वारंवार अत्याचार करण्यात आले. मे २०१९ ते जुलै २०२१ या काळात हा सर्व प्रकार घडल्याचे विवाहितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार, ललीत निकम, जयेश वाघ, नेहा निकम, ज्योती वाघ या चार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, ललित निकम यास अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मे २०२१मध्ये या विवाहितेला गर्भधारणा झाली. त्यामुळे गंजमाळ येथील वाघ हॉस्पिटलमध्ये गर्भपातही करण्यात आला आहे. या सर्व प्रकार अतिशय गंभीर असून याप्रकरणी गंगापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.