नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अपघाताचा बनाव करुन मद्यसाठ्याची परस्पर विक्री करणा-या चालकाचा बनाव उघड झाला आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सहा संशयितांना गजाआड केले आहे. या कारवाईत पिकअपसह तब्बल साडे ३२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या गुन्ह्याची दखल नाशिकचे अधिक्षक शशिकांत गर्जे यांनी घेतली. परभणी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांनी घटनाक्रम जाणून घेत व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीमच्या पडताळणी केली असता मद्यसाठा चालकाने परस्पर विक्री केल्याचा संशय व्यक्त केला. त्यामुळे नाशिकची यंत्रणा कामाला लागली. अधिक्षक गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथकांनी शोध मोहिम हाती घेतला असता चालकाने दारूसाठा जिल्ह्यातच विक्री केल्याचे समोर आले.
दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळूंगी येथील परनॉड रिकार्ड इंडिया प्रा.लि. या कारखान्यातील मद्यसाठा गेल्या ८ जून रोजी अजंता ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून एमएच ४६ एएफ ५८६० याट्रकमधून नांदेड येथील अलका वाईन्सला रवाना करण्यात आला होता. ट्रकमध्ये इम्प्रियल ब्ल्यू या विदेशी व्हिस्कीच्या १८० मिली. क्षमतेच्या ९६० बॉक्स लोड करण्यात आले होते. प्रवासात जिंतूर परभणी रोडवरील पांगरी शिवारात ट्रकचा अपघात झाला. मद्यसाठ्याच्या मोजणीत तफावत आढळून आल्याने परभणी येथील दुय्यम निरीक्षकांनी जिंतूर पोलिस ठाण्यात मद्यसाठा चोरीस गेल्याबाबत तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर ब विभागाचे निरीक्षक सुनिल देशमुख यांचे पथक बुधवारी (दि.२८) महामार्गावर गस्त घालत असतांना वाडिव-हे येथील व्हिटीसी फाटा येथे मद्याने भरलेला पिकअप एमएच १५ ईजी ६६८० वाहन पथकाच्या हाती लागले. दोघांना ताब्यात घेत पिकअपची पाहणी केली असता त्यात १०० बॉक्स आढळून आले. हा साठा अपघातग्रस्त वाहनातील असल्याचे समोर आल्याने एक्साईजने चौकशी सुरू केली.
याच दरम्यान निरीक्षक साबळे यांच्या पथकाने खंबाळे शिवारातील हॉटेल सारेगम आणि इगतपुरी तालूक्यातील धामणी शिवारात छापा टाकून दोन्ही ठिकाणाहून दोन आरोपी आणि ५४ बॉक्स हस्तगत केले. तर अ विभागाचे निरीक्षक योगेश सावखेडकर व विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक अरूण चव्हाण यांच्या पथकांनी वडनेर दुमाला शिवारात छापे टाकून २०० बॉक्स हस्तगत केले. वरिल कारवाईत संदिप भास्कर गायकर, राजेंद्र भागवत पवार, धनंजय निवृत्ती भोसले, रोहित देविदास शिंदे, अजीज फैजुल्ला शेख, अजीत ओमप्रकाश वर्मा आदीं संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या सर्वांच्या ताब्यातून इम्प्रेरियल ब्ल्यू व्हिस्कीचे ३५४ बॉक्स व बोलेरो पिकअ असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वाहनचालकाने संशयितांच्या माध्यमातून जिह्यातच मद्यसाठ्याची परस्पर विक्री करून सदर वाहनाचा अपघात केल्याचे समोर येत असून मद्यसाठ्याची तुटफुट झाल्याचा देखावा निर्माण करून विमा कंपनीस गंडविण्याचा प्रयत्न केल्याचे बोलेले जात आहे.
या कारवाईतून मोठ्या टोळीचा भांडाफोड करण्यात एक्साईज विभागास यश आले आहे. ही कारवाई निरीक्षक सुनिल देशमुख,अरूण चव्हाण,जी.पी.साबळे,योगेश सावखेडकर,जयराम जाखोरे,दुय्यम निरीक्षक पी.बी.ठाकूर,राहूल केदारे,धिरज जाधव,भावना भिरड,सहाय्यक दुय्यम निरीक्षक मनोहर गरूड,विष्णू सानप,मायकल पंडीत,जवान अमित गांगुर्डे, महेश सातपुते,राकेश पगारे,संतोष कडलग,विजेंद्र चव्हाण,संतोष बोºहाडे,सुनिल दिघोळे,महिला जवान सुनिता महाजन,वाहनचालक महेंद्र बोरसे,विरेंद्र वाघ,राकेश पगारे आदींच्या पथकांनी केली. अधिक तपास निरीक्षक सुनिल देशमुख करीत आहेत.