नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरालगत असलेल्या गिरणारे परिसरात अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने मामाच्या गावी आलेली सहा वर्षीय चिमुरडी बिबट्याच्या तावडीत सापडली. या हल्ल्यात या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहरानजिकच्या गावांमध्ये बिबट्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आता गिरणारे परिसरातून अतिशय दुर्दैवी वृत्त समोर आले आहे. संगीता नवनाथ लिलके आणि नवनाथ हरी लिलके (मूळ गाव रा. कोचरगाव, हल्ली मु धोंडगाव) हे आपली कन्या गायत्री हिच्यासह धोंडेगाव येथे राहत आहेत. बुधवारी (२७ एप्रिल) रात्री आठ वाजेच्या सुमारास गायत्री ही मामाच्या अंगणात खेळत होती. त्याचवेळी अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. गायत्रीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मामासह घरातील कुटुंबिय बाहेर आले. या हल्ल्यात गायत्री अतिशय गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबियांनी तिला उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे धोंडेगाव परिसरातील ग्रामस्थ अतिशय संतप्त झाले. या घटनेची माहिती पोलिस आणि वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर तत्काळ दोन्ही पथके घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावण्यासाठी तातडीने नियोजन सुरू केले आहे. कुठल्याही परिस्थितीत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.