नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोडच्या जेलरोड परिसरामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. चेंडू गिळल्याने अवघ्या १७ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलरोड परिसरात बोराडे कुटुंबिय राहतात. कुटुंबातील अवघ्या १७ महिन्याचा असलेला शिवांग संकेत बोराडे हा गुरुवारी (१२ मे) दुपारी टेब टेनिसचा चेंडू खेळत होता. खेळता खेळता त्याने हा चेंडू तोंडात टाकला. त्यानंतर हा चेंडू त्याच्याकडून गिळल्या गेला. मात्र, त्याचवेळी त्याला खुपच अस्वस्थ वाटू लागले. बोराडे कुटुंबियांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने शिवांगला नाशिकरोडच्या मनपा बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परिस्थितीचे गांभिर्य आणि शिवांगची प्रकृती लक्षात घेता डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र, उपचार सुरू असतानाच शिवांगची प्राणज्योत मालवली. शिवांगच्या या दुर्दैवी निधनामुळे बोराडे कुटुंबासह परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.