नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे. चेन स्नॅचिंग, लुटमार, महिला अत्याचार हे प्रकार सुरूच असताना आता त्यात खुनांची भर पडली आहे. आडगाव परिसरात महिलेची हत्या झाल्यानंतर आज आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. म्हसरुळ परिसरात बुधवारी रात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे.
म्हसरुळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी रोडवरील आकाश पेट्रोल पंपाजवळ बुधवारी (१८) रात्री उशिरा यश रामचंद्र गांगुर्डे (वय २४ वर्षे) या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. धारदार शस्त्राने त्याच्या पोटात वार करण्यात आले. हा हल्ला एवढा जबर होता की त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, यश सोबत असलेल्या त्याच्या मित्राने घटनास्थळावरुन पोबारा केला आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्त्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावरुन विविध बाबी हस्तगत केल्या असून अधिक तपास सुरू आहे.
आयुक्तांपुढे आव्हान
गेल्याच महिन्यात नाशिक पोलिस आयुक्तपदाची सूत्रे जयंत नाईकनवरे यांनी स्वीकारली आहेत. त्यातच शहर परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर शहरात पोलिसांची लाचखोरीही वाढली आहे. आडगाव पोलिस स्टेशनमधील एक हवालदार आणि भद्रकाली पोलिस स्टेशनमधील सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस नाईक असे तीन जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडले आहेत. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीला रोखण्याबरोबरच पोलिस दलातील लाचखोरीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांना कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. त्यादृष्टीने ते काय पावले उचलतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.