नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट कागदपत्राच्या आधारे अनेकांच्या नावाने कर्ज काढून कर्मचाºयाने बँकेस तब्बल ५४ लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जाची वसूली न झाल्याने बँकेने शोध घेतला असता या बनावट कर्ज प्रकरणांचा भांडाफोड झाला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भामट्या प्रतिनीधीसह कर्जदारांचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश नाना पाटील (रा.आबाड रेसि.तळवाडेरोड चांदवड),गणेश फकिरा सांगळे,सुर्यकांत पंढरीनाथ वाघुळे,ताई पांडूरंग पगारे,योगेश सुकदेव काकड,सुरेखा सुखदेव गायकवाड, नंदू देवराम काळे व स्वाती प्रविण शिरसाठ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून योगेश पाटील हा बँकेच्या अधिकृत प्रतिनिधी आहे तर उर्वरीत संशयित कर्जदार आहेत. याप्रकरणी आयडीएफसी फर्स्ट बँकेचे प्रमोदकुमार ओमकारेश्वर अमेटा (रा.कांदीवली,मुंबई) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या मायको सर्कल शाखेत हा बनावट कर्जप्रकरणाचा प्रकार घडला आहे. बँकेचा अधिकृत प्रतिनिधी असलेल्या योगेश पाटील याने उर्वरीत संशयित कर्जदार ग्राहकांशी संगनमत करून २ मार्च ते ३० नोव्हेंबर दरम्यान संबधिताचे बनावट बँक स्टेटमेंट तयार करून ते बँकेस सादर केले व संबधीतांच्या नावे लाखोंचे कर्ज मंजूर करून ते उचलले आहेत. ५४ लाख ६ हजार ८६२ रूपयांचा हा घोटाळा असून कर्जाची वसूली न झाल्याने हा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
Nashik Crime IDFC Bank 54 Lakh Fraud Cheating