नाशिक – नाशिकरोड परिसरातील एका खासगी हाॅटेल मध्ये पतीने पत्नीला भेटायला बोलावून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीचा खून केल्यानंतर हाॅटेल मधून बाहेर पडणाऱ्या पतीला नाशिकरोड पोलिसांनी बिटको पाॅईंट परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.
नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगाव (जि. अहमदनगर) येथील ज्योती पोपट वीर व पती पोपट वीर यांच्यात वाद सुरू होता. याच कारणावरुन ज्योती या जेलरोड भागातील त्यांच्या माहेरी आल्या होत्या. पती पोपट याने पत्नी ज्योतीला मंगळवारी (२८ सप्टेंबर) सायंकाळी बिटको पाॅंईट येथील पवन हाॅटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. हॉटेलमध्ये पत्नी आल्यानंतर दोघांमध्येही वाद झाला. त्यानंतर पतीने पत्नीचा गळा दाबला. त्यासाठी पत्नीच्याच ओढणीचा वापर केला. पत्नी बेशुद्ध होताच पोपट वीर हा तेथून पळ काढत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक गणेश न्याहळे, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पथकाने तातडीने संशयिताला ताब्यात घेतले. दरम्यान, ज्योती यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.