नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पंडित कॉलनीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरकाम करणाऱ्या मोलकरणीने तब्बल ११ लाख रुपये लंपास केले आहेत. याप्रकरणी घरमालक असलेल्या वैशाली अनिल जैन (रा. स्नेह बंगला, नवीन पंडित कॉलनी, नाशिक) यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसाकडून चौकशी सुरू झाली आहे.
जैन यांनी दिलेली तक्रार आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरकामासाठी असलेल्या मोलकरणीने घरमालकिणीचे लक्ष विचलित करून वेळोवेळी सुमारे ११ लाख रुपये चोरुन नेले आहेत. जैन यांच्या बंगल्यात किरण ज्ञानेश्वर साळवे (वय 31, रा. ध्रुवनगर, गंगापूर रोड) ही महिला घरकामासाठी मोलकरीण म्हणून काम करीत होती. मोलकरीण साळवे हिने जैन यांचा विश्वास संपादन केला. 21 डिसेंबर 2021 ते 3 फेब्रुवारी 2022 या कालावधीत साळवे हिने जैन यांच्या बंगल्यातून वेळोवेळी पैसे चोरून नेले. ही बाब जैन यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी मोलकरणीकडे विचारणा केली. मात्र, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे जैन यांचा संशय बळावला. अखेर जैन यांंनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे. जैन यांच्या बंगल्यातून साळवे या महिलेने वेळोवेळी सुमारे 10 लाख, 94 हजार रुपये चोरून नेल्याच्या संशय आहे. तसे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मोलकरणीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिला अटकही केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये करीत आहेत.