नाशिक – सिडकोतील हॉटेल एक्सलन्स इन येथे शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ३१ वर्षीय तरुणाचा खड्डयात पडून जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद सुखदेव गीते (रा.मोती चौक, सावतानगर) हा सिडकोतील सिंबॉयसिस महाविद्यालया शेजारील हॉटेल एक्सलन्स इन मध्ये पाहुण्यांसाठी रूम पाहायला जात होता. शनिवारी रात्री हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर जात असतान सुरू असलेल्या बांधकामामुळे तोडलेल्या भागाचा अंदाज न आल्याने त्याचा तोल जाऊन तो ३५ फूट खोल खड्ड्यात पडला. खड्ड्यातील दगडांवर अपटल्याने गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यु झाला.
या हॉटेलच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे, त्यासाठी मागील भागात जेसीबीच्या सहाय्याने २० फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. तसेच त्यालगतच्या वरच्या मजल्यावरील कठडे संरक्षण भिंतीचा काही भाग तोडण्यात आलेला होता. बांधकाम सुरू असताना नियमाने याठिकाणी सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना हॉटेल व्यवस्थापनाने लावणे गरजेचे होते. मात्र हॉटेल व्यवस्थापनाने सुरक्षितता न राबवल्याने तसेच हॉटेलच्या गलथान कारभारामुळे विनोदचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला असून या घटनेला हॉटेल व्यवस्थापनच जबाबदार असल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक शेवाळे पुढील तपास करीत आहेत.
बघा या घटनेचा थरारक व्हिडिओ
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/642126467222839/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C
पोलीस ठाण्यात गर्दी
मृत युवकाचा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत व हॉटेल मालक बुरकुले वर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात नातेवाईक, मित्र परिवार व प्रभागाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह शेकडो नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.