नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे व स्वस्तात सोने खरेदी करून देण्याच्या बहाण्याने भामट्याने दोघा बहिणींना एक लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरील ओळखीतून हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशवर्धन सुरेश देशमुख पाटील असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. ढिकले नगर भागातील २९ वर्षीय तरूणीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तरूणीने आपल्या विवाहासाठी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी याच संकेतस्थळाच्या माध्यमातून तरूणी आणि संशयितांमध्ये संपर्क झाला होता. यावेळी त्याने लग्नाचे आमिष दाखवत विवाहासाठी स्वस्तात सोने खरेदी करून देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे युवतीने व तिच्या बहिणीने विश्वास ठेवून गुगल पे आयडीवर आॅनलाईन पैसे पाठविले असता ही फसवणुक झाली. युवतीने २६ नोव्हेंबर २०२१ ते २ जूलै २०२२ दरम्यान त्यास १ लाख ६०० रूपयांची रोकड त्यास वेळोवेळी पाठविली असून त्याचा संपर्क तुटल्याने युवतीने पोलिसात धाव घेतली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रतिक पाटील करीत आहेत.
Nashik Crime Gold Two Sisters Cheating 1 lakh rupees police