नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्जाची परतफेड करूनही दागिणे न मिळाल्याने चिरायू नागरी सह.पतसंस्थेच्या दोन पदाधिका-यांविरुध्द कर्जदाराच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दिपक रावसाहेब पठारे (रा.उल्हासनगर,ठाणे) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. नंतर तो गुन्हा म्हसरुळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. सोने तारण गहाण कर्जातील अलंकाराचा पतसंस्था प्रशासनाने परस्पर विल्हेवाट लावल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार . जैन व राहूल बागमार अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित पतसंस्थाचालकांची नावे आहेत. याप्रकरणी पठारे यांनी तक्रार दाखल केली. पठारे यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मखमलाबादरोडवरील जाधव कॉलनीत असलेल्या संशयितांच्या चिरायू नागरी सहकारी पतसंस्थेतून सोने तारण गहाण कर्ज घेतले होते. या पोटी सुमारे १६ लाख २ हजार ५५ रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे पतसंस्थेत गहाण ठेवले होते. त्यानंतर त्यांनी कर्जाची परतफेड केली असता अपहाराचा हा प्रकार समोर आला. संशयित व्यवस्थापक व अध्यक्षांनी संगनमत करून दागिण्यांचा परस्पर अपहार केला. मुदतीत कर्जाची परतफेड करूनही दागिणे परत न मिळाल्याने पठारे यांनी पतसंस्थेच्या शाखेत विचारणा केली असता अपहार व फसवणुक झाल्याचे समोर आले. पठारे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास म्हसरूळ पोलिस करीत आहेत.
संचालक म्हणतात
याप्रकरणी संचालक डॉ. राहुल जैन-बागमार यांनी सांगितले आहे की, मी चिरायू नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेचा चेअरमन असून माझ्याविरुद्ध पंचवटी पोलीस स्टेशन येथे दिनांक 5-9-2023 रोजी भादवी कलम 406,403,417,420 अन्वये खोटा गुन्हा दाखल झाल्याची बाब माझ्या निदर्शनास आली आहे. याबाबत हकीकत अशी की, चिरायू नागरी सहकारी पतसंस्थेने संस्थेच्या एका महिला कर्जदारास (महिला असल्याने नाव सार्वजनिक करणे शक्य नाही) यांना सोनेतारण कर्ज दिले होते. सदर कर्जापोटी त्यांनी संस्थेस त्यांच्या सेविंग खात्यावरून भरणा करून कर्ज बेबाक केलेले आहे. परंतु माननीय न्यायालयाने सदर सोने जप्त करण्याबाबत आदेश पारीत केलेला असल्याने, सदर सोने संस्थेने त्यांना परत केलेले नाही. तसेच रूपिक कॅपिटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सदर कर्जदार यांचे संस्थेकडे तारण सोने टेक ओव्हर करण्यापूर्वी संस्थेशी कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार केलेला नाही. तसेच संस्थेने सदर सोने माननीय न्यायालयाच्या आदेशाने जप्त केलेले असल्याची बाब माहित असताना देखील संस्थेची बदनामी करण्याच्या तथा खंडणी उकळण्याच्या हेतूने माननीय न्यायालयाची दिशाभूल करून तथा सत्य माहिती लपवून संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करावयाचा आदेश प्राप्त केला आहे. या संदर्भात संस्था कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करीत आहे, असे जैन-बागमार यांनी म्हटले आहे.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik Crime Gold Patasanstha Cheating Loan FIR