नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मित्र मैत्रिणींसमवेत घरात पार्टी करणे एका महिलेस चांगलेच महागात पडले आहे. रात्रभर चाललेल्या पार्टी दरम्यान चोरट्यांनी घरातील ६० हजाराच्या रोकडसह सुमारे साडे पाच लाख रूपये किमतीचे अलंकारांवर डल्ला मारला असून, महिलेने आपल्या मित्र आणि मैत्रिणीवर चोरीचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका पवार (रा.पाईपलाईन रोड,गंगापूररोड), रावसाहेब पगारे (रा.एबीबी सर्कल) व विशाल घन (रा.सावतानगर) अशी महिलेने संशय व्यक्त केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी योगिता यशवंतराव (वय ३०) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि तक्रारदार महिला एकमेकांची मित्र मैत्रिणी असून, त्यांनी गुरूवारी (दि.१) रात्री तिडके कॉलनी भागात राहणाऱ्याया तक्रारदार महिलेच्या घरात पार्टीचे आयोजन केले होते. या ठिकाणी शाकाहारी व मांसाहाराची व्यवस्था करण्यात आल्याने पार्टी रात्रीच्या वेळी उत्तरोत्तर रंगत गेली. चौघे मित्र मैत्रिणी पार्टीत गुंग असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या घरातील कपाट उघडून ६० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५ लाख ५६ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आली. मुक्कामी थांबलेली मित्र कंपनी दुसऱ्या दिवशी आपआपल्या घरी परतल्यानंतर ही बाब महिलेच्या निदर्शनास आली. महिलेने तात्काळ आपल्या मित्रांकडे चौकशी केली मात्र संशयितांकडून चोरीचा प्रतिसाद न लाभल्याने तिने पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक साजीद मन्सूरी करीत आहेत.
Nashik Crime Friends Party Home Dacoity
Theft Police Mumbai Naka