नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवाळीच्या दिवशी भरवस्तीत बेकायदेशीर पिस्तूल मधून गोळी झाडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणा-या पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे दीड लाख रूपये किमतीचा पिस्तूल हस्तगतही पोलिसांनी केले आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. आकाश संजय आदक (२४ रा.साईनाथ मंदिराजवळ, ध्रुवनगर सातपूर गंगापूर लिंकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. व्हिडिओ बनवणा-या आदकचा शोध गेल्या काही दिवसापासून पोलिस घेत होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला हुडकून काढत कारवाई केली.
आदक याने गेल्या ऑक्टोंबर महिन्यात दिवाळीच्या दिवशी सुरू असलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीत फायर करून त्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केल्याची कबूली दिली आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे दीड लाख रूपये किमतीचा पिस्तूल हस्तगत करण्यात आला आहे. पिस्तूल बाबत पोलिस चौकशी सुरू असून त्याने त्या कोठून व कशासाठी आणल्या याबाबत विचारपूस सुरू आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितासह पिस्तूल गंगापूर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार प्रदिप म्हसदे,प्रविण वाघमारे,प्रशांत मरकड,नाझिमखान पठाण,आसिफ तांबोळी,विशाल देवरे,महेश साळुंके,मुक्तार शेख आदींच्या पथकाने केली.
असा घेतला शोध
सोशल मिडीयावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ कुठला व कधीचा याबाबतची चर्चा रंगत असतांनाच युनिटचे अंमलदार प्रशांत मरकट यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. खब-या कडून मिळालेल्या माहितीवरून पथकाने शोध घेवून संशयितास त्याच्या घरातून ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
Nashik Crime Firing Diwali Video Viral Arrested