नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बसमध्ये झोपलेल्या परप्रांतीय पर्यटकांच्या खिशातील रोकडसह मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना गोदाघाटावर घडली. या घटनेत सुमारे ९६ हजाराच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रामगोपाल रामप्रसाद शर्मा (रा.विजयपुर जि.शिवपुर मध्यप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. मध्यप्रदेशातील शिवपुरी जिह्यात राहणारे काही यात्रेकरून ट्रव्हल्सच्या बसमधून देवदर्शनासाठी शहरात दाखल झाले असता ही घटना घडली.
बुधवारी (दि.) पहाटेच्या सुमारास चालकाने गोदावरी घाटावरील रामकुड परिसरात असलेल्या गाडगे महाराज पुलावजवळ बस पार्क केली होती. सर्व प्रवासी झोपेत असतांना अज्ञात चोरट्यांनी शर्मा यांच्यासह सुनिल शर्मा,बैजनाथ सिंग व रवी बातम आदी यात्रेकरूंच्या खिशातील रोकड व मोबाईल असा सुमारे ९६ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार वाडेकर करीत आहेत.
वृध्देच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या वृध्देच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यानी ओरबाडून नेले. ही घटना काठेमळा भागात घडली या घटनेत सुमारे ३५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र चोरट्यांनी हिसकावून नेले असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोभा पोपटराव महाले (६८ रा.आयोध्यानगर,काठेमळा उपनगर) यांनी फिर्याद दिली आहे. महाले या मंगळवारी (दि.१३) रात्री जेवण आटोपून शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. घरासमोर त्या रस्त्याने पायी जात असतांना अॅक्टीव्हावर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ३५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.