नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडिलोपार्जीत भाडेतत्वावरील मिळकत असतांना ट्रस्टींनी पदाचा गैरवापर करीत सदर मिळकतीचा परस्पर भाडेपट्टा करार केल्याचा प्रकार समोर आला आहे. खोट्या घोषणापत्राच्या आधारे याबाबत नोंदणी करण्यात आली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय प्रमोद श्रीवास्तव (रा.संत आंद्रीया चर्च जवळ,शरणपूर),जवाहर अविनाश उजागरे (रा.एचडीएफसी बँकेमागे,शरणपूररोड),प्रविण कुमार पुरोहित (रा.कर्मयोगीनगर त्रिमुर्ती चौक,सिडको) ,हर्षल जेठले,विपूल लाठी व अन्य पदाधिकी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत किरण अल्फ्रेड हम्फ्रे (रा.रचना विद्यालयाजवळ,शरणपूर) यांनी फिर्याद दिली आहे. नाशिक डायोसेशन ट्रस्ट असो.प्रा.लि या ट्रस्टने इम्फ्रे यांच्या वडिलांना सन. १९६८ मध्ये नाशिक महापालिका हद्दीतील शरणपूर परिसरात सिटी सर्व्हे नं. ६९०४, ६९०८ व ६९११ मधील एकुण क्षेत्र ८७४.७५ चौ.मि. ही मिळकत भाडेकराराने दिली आहे. या बाबत दस्त क्रमांक २८५ – १९६८ नोंदणी करण्यात आलेली आहे. तेव्हा पासून ही मिळकत इम्फ्रे कुटूंबियांच्या कब्जात आहे. इम्फ्रे यांच्या मृत्यूनंतर या मिळकतीच्या मालमत्ता पत्रकामध्ये धारक म्हणून फिर्यादी किरण इम्फ्रे व त्यांच्या बहिण भावांची नावे लागली आहेत.
गेल्या २८ जून रोजी संशयित ट्रस्टचे अजय श्रीवास्तव व जवाहर उजागरे यांनी विपूल लाठी यांच्याशी संगनमतर करून व गैरमार्गाने कंपनीचे संचालक पद मिळविले. न्यायालयाने श्रीवास्तव यास संचालक पदाचा गैरवापर तसेच मिळकती संदर्भात व्यवहार करण्यास मनाई केलेली असतांना संबधितांनी जवाहर उजागरे यास भाडेपट्टा व इतर करार करण्यास अधिकार पत्र दिले. नमुद मिळकत हडप करण्याच्या उद्देशाने संशयित जवाहर उजागरेव बिमबॉक्स टेक्नोलॉजीस प्रा.लि. कंपनीच्या वतीने प्रविण पुरोहित यांनी भाडेपट्टा करार करून त्याबाबत खोटे घोषणापत्र सादर करून नोंदणीकृत केला असून यामुळे इम्फ्रे कुटूंबियांसह शासनाची फसवणुक करण्यात आल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक आव्हाड करीत आहेत.