नाशिक – शहरात अत्यंत लाजीरवाणी घटना घडली आहे. दोन गट चक्क अमरधाममध्ये शोकसभेवेळी एकमेकात भिडले आहेत. दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून त्यात काही जण जखमीही झाले आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ज्येष्ठ गायक व गीतकार विनायक दादा पाठारे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पंचवटीतील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार सुरू होते. त्याचवेळी शोकसभेत दाेन गटांमध्ये तुफान राडा झाला. या प्रकरणी भद्रकाली पाेलिसांनी माजी महापाैर अशाेक दिवे, त्यांची दाेन्ही मुले तसेच रिपाइंचे शशी उन्हवणे व गणेश उन्हवणे यांच्यासह दाेन्ही गटांतील एकूण १२ जणांविरुद्घ परस्परविराेधी गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणी विक्रांत अनिल गांगुर्डे (२४, रा. समतानगर आगरटाकळी, गांधीनगर नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार
ते त्यांचे वडील अनिल गांगुर्डे, भाऊ प्रशांत गांगुर्डे हे नाशिक अमरधाममध्ये (दि. २७) दुपारी एक वाजता विनायक दादा पठारे यांच्या अंत्यविधीसाठी आले हाेते. अग्निडाग झाल्यानंतर ते व कुटुंब शोकशभेत उपस्थित असताना संशयित अशोक नामदेव दिवे, राहुल अशोक दिवे, प्रशांत अशोक दिवे, जयेश सोनवणे, अनिकेंत उर्फ पप्पू बाळू गांगुर्डे (सर्व रा. समतानगर, आगार टाकळी) तसेच राहुल दिवे यांचा वाहनचालक यांनी बेकायदेशिर गर्दी जमवून जुन्या वादाचा राग मनात धरुन विक्रांत गांगुर्डे व कुटुंबाला शिवीगाळ करुन मारुन टाकू अशी धमकी दिली. यानंतर अंत्यविधीसाठी असलेले खालील लाकडे व बांधकामाच्या दगडांनी मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे.
तर जयेश लक्ष्मण सोनवणे (३५ रा. समतानगर, आगर टाकळी, गांधीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते नाशिक अमरधाममध्ये असताना संशयित अनिल गांगुर्डे, प्रशांत अनिल गांगुर्डे, विक्रांत अनिल गांगुर्डे, सविता आनिल गांगुर्डे (सर्व रा. समतानगर आगर टाकळी), शशि उन्हवणे, गणेश उन्हवणे (दाेघे रा. भीमनगर, जेलरोड, नाशिकरोड) यांनी गैरकायदयाची मंडळी जमवून जुन्या वादाचा राग मनात धरुन जयेश साेनवणे व त्यांचे पाच साथीदारांना शिवीगाळ करुन जयेश, अनिकेत उर्फ पप्पू गांगुर्डे व तुषार सोनकांबळे यांना अंत्यधिसाठी पडलेले लाकडे व पडलेल दगडे घेवून मारहाण करुन जखमी केले. या परस्परविराेधी दाखल गुन्ह्यांचा तपास उपनिरीक्षक गवळी करत आहेत.