नाशिक – गोदावरी नगर येथील घारपुरे घाट परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत एका अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून यावेळी एकाने पिस्तूलाचा धाक दाखवित परिसरात दहशत माजविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि विविध कलमान्वये परस्परोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका अल्पवयीन संशयीतास ताब्यात घेत पोलीसांनी दोन्ही गटातील पाच जणांना अटक केली आहे.
सचिन चव्हाण (२१),आकाश उर्फ शुभम घनवटे (१९),बबन धनवटे (४८) चैतन्य कासव (१९) व मक्या उर्फ मकरंद देशमुख अशी अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. तर गोदावरी घाट परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अथर्व अजय दाते (१७ रा.अशोक स्तंभ) या मुलाने दिलेल्या तक्रारी नुसार, दाते व प्रतिक भालेराव यास सोबत घेवून बुधवारी (दि.२२) सायंकाळी घारपुरे घाट येथील मकवाना चाळ येथे घरासमोर सचिन चव्हाण यास पतंग उडविण्याच्या जुन्या वादाचा जाब विचारण्यासाठी गेलो असता चव्हाणसह आकाश धनवटे,बबन धनवटे आणि अल्पवयीन मुलाने दोघांना शिवीगाळ करीत झटापट केली.
यावेळी संशयीत त्रिकुटाने पकडून ठेवले असता अल्पवयीन मुलाने जीवे मारण्याच्या हेतूने दाते याच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत दाते गंभीर जखमी असून पोलीसांनी सचिन चव्हाण,आकाश धनवटे आणि बबन धनवटे यांना अटक केली आहे. तर सचिन चव्हाण याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी चैतन्य कासव (१९),मक्या उर्फ मकरंद देशमुख, अथर्व दाते, प्रतिक भालेराव आणि आकऱ्या नामक युवकाशी वाद झाला होता.
सायंकाळच्या सुमारास संशयीतांनी मकवाना चाळ येथे येवून चव्हाण व शेजारी बबन व आकाश धनवटे यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी मक्याने कमरेला लावलेला पिस्तूल दाखवून परिसरात दहशत निर्माण केली. याघटनेत चैतन्य कासव आणि मकरंद देशमुख या दोघांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक विष्णू भोये आणि उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.