नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धक्का लागल्याच्या कारणातून चार जणांच्या टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना कालिका मंदिर परिसरात घडली. या घटनेत टोळक्याने लोखंडी गजाचा वापर केल्याने तरूण जखमी झाला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित चंद्रकांत सोनवणे (३१ रा.रायगड चौक,पवननगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे रविवारी (दि.९) रात्री कालिका मंदिर परिसरात गेला होता. हॅपी टाईम्स हॉटेल भागातून तो पायी जात असतांना धक्का लागल्याच्या कारणातून चार जणांच्या अज्ञात टोळक्याने त्याच्याशी वाद घातला. यावेळी संतप्त टोळक्याने शिवीगाळ करीत त्यास बेदम मारहाण केली. या घटनेत लोखंडी गजाचा वापर करण्यात आल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शेळके करीत आहेत.
सातपूर गावात जुगार खेळणाऱ्या दोघांवर कारवाई
सातपूर गावात जुगार खेळणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे एक हजार ५१० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमराज मधुकर भारंबे (५२) व लक्ष्मण शालिग्राम भंगाळे (५३ रा. दोघे भंदुरे मळा,सातपूर) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत. सातपूर गावातील सावता माळी मार्ग भागात दोन जण लोकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी धाव घेत छापा टाकला.
सुलभ शौचालया शेजारी अंक अकड्यावर पैसे लावून कल्याण नावाचा मटका खेळतांना व खेळवितांना संशयित मिळून आले. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे १ हजार ५१० रूपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत अंमलदार गोकुळ कासार यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
Nashik Crime Fight Beaten Police