नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बापानेच स्वतःच्या शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळा उघडताच मुलीने शिक्षकांकडे आपबिती कथन केली. त्यामुळे हा सर्व प्रकार पोलिसांपर्यंत पोहचला आहे. शिक्षिकेने अभोणा (ता. कळवण) पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, हा प्रकार नाशिक शहरात घडला असल्याने हा गुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवण तालुक्यातील एका आश्रमशाळेच्या शिक्षिकेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अल्पवयीन पिडीता कळवण तालुक्यातील एका शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षण घेत आहे. ही पिडीता १६ डिसेंबर २०२१ ते ४ जानेवारी २०२२ यादरम्यान शाळेस सुट्टी असल्याने डोंगऱ्यादेव महोत्सवानिमित्त नाशिकस्थित पित्याकडे वास्तव्यास आली. त्याचवेळी बापाने तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. डोंगऱ्यादेव महोत्सवा निमित्त आदिवासी विकास विभागाच्या वतीने आश्रम शाळांना सुट्टी देण्यात येते या काळात मुलांना पालकांच्या स्वाधिन करण्यात आले होते. संशयित बापाने याकाळात घरात कुणी नसतांना मुलीच्या अज्ञातपणाचा फायदा उचलत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही बाब शाळा सुरू होताच पिडीतेने आपल्या शिक्षिकेकडे कथन केली. त्यानंतर हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. शिक्षिकेने आपल्या वरिष्ठांना या घटनेची माहिती देली. त्यानंतर पिडीतेच्या आई आणि मामाला सोबत घेत शिक्षिकेने आभोणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा गुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने तो झिरो नंबरने वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक प्रणिता पवार करीत आहेत.