नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बापलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना उजेडात आली आहे. बापानेच आपल्या लेकीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. आदिवासी बहुल असलेल्या दिंडोरी तालुक्यातील या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेली कसून चौकशीत ही बाब समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी येथील जंगलात एका अल्पवयीन फासावर लटकविण्याचा प्रकार उजेडात आला. धक्कादायक म्हणजे बापानेच या मुलीला मारून टाकण्याच्या हेतूने जंगलात आणले होते. पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास देहेरवाडीच्या जंगलात काही गुराख्याना संशयास्पद प्रकार आढळून आला होता. या ठिकाणी एका मुलीस फासावर लटकावण्याचा प्रकार घडत होता. यावेळी गुराख्यानी हा प्रयत्न हणून पाडला होता. मात्र सदर इसम घटनस्थळावरून फरार झाला होता. अखेर पोलिसांनी या इसमास शोधून काढले असून हा दुसरा तिसरा कोणी नसून चक्क मुलीचा बापच या घटनेमागे असल्याचे तपासात समोर आले.
घरगुती भांडणातून मुलगी नकोशी झाल्याने जंगलात नेऊन मुलीला संपवण्याचा प्लॅन या बापाने रचला होता. मात्र येथील गुराख्यानी तो प्रयत्न हणून पाडला. मुलगी नकोशी झाली म्हणून बापानेच तिचा काटा काढायचा प्लॅन केला होता. यासाठी दिंडोरी तालुक्यातील देहेरवाडीच्या जंगलात तिला आणले होते. यावेळी फासावर लटकवत असतांना गुराख्यानी पहिले. तिथून या बापाने धूम ठोकली. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापाला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. सध्या या मुलीवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.