नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यू प्रकरणात वाजे कुटुंबीय आणि गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए एकच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे आज जोरात फिरली अन अखेर डॅा. वाजे यांचे पती संदीप वाजे यांना पोलिसांनी गजाआड केले. या प्रकरणात अन्य साथीदारांनाही अटक केली आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
डॅा. वाजे यांचा मृतदेह काही दिवसापूर्वी वाडीवऱ्हे परिसरात पोलिसांना जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. हा मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचा असल्याची प्राथमिक माहिती होती. तत्पूर्वी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या पतीने वाजे यांच्यासंदर्भात मिसिंगची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकरणात तपास सुरु केला होता. डीएनए रिपोर्ट आल्यामुळे पोलिसांनी डॉ. सुवर्णा वाझे यांना शहराबाहेर नेऊन त्यांची जाळून का हत्या करण्यात आली या दिशेने तपास करत असतांनाच त्यांच्या हाती धागदोरे हाती लागले व त्यांनी डॅा. वाजे यांच्या पतीस अटक केली.
पोलिसांनी आज डॉ. सुवर्णा वाजे यांची गाडी जाळण्यासाठी संशयिताने कोणत्या ज्वलनशील पदार्थाचा वापर केला, याचा शोध सुर केला होता. तर शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे कामही सुरु केले होते. त्याचप्रमाणे डॉ. सुवर्णा वाजे यांच्या बहीण आणि रुग्णालयातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले तर माहेरच्या नातेवाईकांकडूनही काही माहिती घेतली होती. त्याचबरोबर डॉ. वाजे यांच्या पतीची विचारपूस केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.