नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात गुन्हेगारीने कळस गाठला असून दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरले आहे. चुंचाळे परिसरातील संदीवनगरमध्ये दोन तरुणांची हत्या झाली आहे. यातील एक जणाचा काल रात्रीच मृत्यू झाला होता. तर, दुसऱ्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या हत्याकांडाची गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, हत्येचे कारणही आता समोर आले आहे.
भाषा न समजल्याच्या कारणाने आपापसात झालेल्या शिवीगाळ आपल्यालाच झाली आहे असे समजून झालेल्या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर चार जणांनी दोघांवर केलेल्या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना संजीव नगर परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाषा न समजल्यामुळे आपापसामध्ये सुरू असलेली शिवीगाळ ही आपल्यालाच होत आहे या कारणावरून वादावादी झाली. यामध्ये चार जणांनी मिराज खान (१९ ) व इब्राहिम शेख ( २४ ) यांच्यावर हातातील लाकडी दांडक्याने व धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. यामध्ये मिराज याचा जागीच मृत्यू झाला तर इब्राहिम याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राऊत यांच्यासह अधिकाऱ्यांनी व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन अल्पवयीन मुलांसह साहिल लिलके व वैभव धोंगडे यांना तात्काळ अटक केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज देखील प्राप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपास एमआयडीसी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे करीत आहेत.
Nashik Crime Double Murder Police Investigation
Chunchale Sanjiv Nagar City Ambad