नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुत्र्यांच्या भांडणामुळे दोन चिमुकल्या मुली भाजल्याची धक्कादायक घटना नाशिक तालुक्यामध्ये घडली आहे. या दोन्ही चिमुरड्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या देवरगाव या गावात ही दुर्घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास देवरगाव गावातील एका घराबाहेरच चुलीवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. तर, दोन्ही चिमुरड्या घराबाहेर खेळत होत्या. त्याचवेळी एक कुत्रा घराच्या येथे आला. चिमुकल्यांच्या घरात पाळलेला कुत्रा आणि मोकाट कुत्रा यांचे जोरदार भांडण सुरू झाले. या भांडणादरम्यानच या कुत्र्यांचा धक्का चुलीवरील पाण्याच्या भांड्याला लागला. त्यामुळे हे गरम पाण्याची भांडे चुलीवरुन खाली पडले. हे गरम पाणी दोन्ही चिमुरड्यांच्या अंगाला लागले. या अपघातात रुपाली कराटे आणि पल्लवी कराटे या दोन्ही चिमुरड्या भाजल्या आहेत. दोघांवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एक चिमुरडी अधिक भाजली असून दुसऱ्या चिमुरडीला किरकोळ दुखापत झाली आहे.