नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दवाखाना बांधकामासाठी दोन कोटी रूपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने डॉक्टरला सव्वा सतरा लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रोसेसिंग फी आणि वेगवेगळी कारणे सांगून ही रक्कम उकळण्यात आली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश टिकमदास तेजवाणी (रा. गुरूगोविंद कॉलेज समोर, इंदिरानगर) असे गंडा घालणाऱ्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. गौरव अशोकराव गिते (रा. एमएचबी कॉलनी, सातपूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. डॉ. गिते यांनी दवाखाना बांधकामासाठी संशयिताशी संपर्क साधला असता ही फसवणुक झाली.
डॉ. गिते यांनी स्वतःचा भूखंड घेवून ठेवला आहे. त्याच्यावरील बांधकामासाठी संपर्क साधला असता त्याने व्यंकटेश असोसिएटस या फायनान्स कंपनीतून १ कोटी ९० लाख रूपयांचे कर्ज मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. डॉ. गिते यांचा विश्वास संपादन करून संशयिताने दि.१२ ते २४ मार्च दरम्यान स्टॅम्प ड्युटी, प्रोसेसिंग फी, खाते उघडण्यासाठी व हॅण्डलींग फीच्या नावाखाली त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. ही एकत्रित रक्कम तब्बल १७ लाख २० हजार रुपये एवढी आहे. दीड वर्ष उलटूनही कर्ज मंजूर न झाल्याने डॉ. गिते यांनी पाठपुरावा केला असता संशयिताने टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास निरीक्षक वांजळे करीत आहेत.
Nashik Crime Doctor Cheating 17 lakh fraud