नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा व सत्र न्यायालयाने पोलिसांवर हल्ला करणा-या एकाच कुटुंबांतील आठ सदस्यांना न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची आणि बारा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. ही घटना प्रबुध्द नगर भागात २०१८ रोजी घडली होती. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी अन्य विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींमध्ये आनंदा उर्फ अनिल विठ्ठल पालवे (२५),रामदास विठ्ठल पालवे (३३),संतोष विठ्ठल पालवे (३१), समाधान विठ्ठल पालवे (२२)विठ्ठल बबन पालवे (५३),सोनी रामदास पालवे (३०) वेणूबाई विठ्ठल पालवे (५० रा.सर्व क्रांतीसम्राट चौक,प्रबुध्दनगर) व दिपक उर्फ आबा भास्कर अहिरे (२६ रा.सिध्दार्थनगर,एकलहरे) अशी नावे आहेत.
याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालिन उपनिरीक्षक सरिता जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करून पुराव्यानिशी दोषारोप न्यायालयात सादर केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय क्र.११ च्या न्या. यु.जे.मोरे यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे सहाय्यक अभियोक्ता अॅड.रविंद्र निकम यांनी बाजू मांडली असता न्यायालयाने एकाच कुटुंबातील सर्व संशयिताना तीन महिने कारावास आणि बारा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
गोंधळ घालून पोलिसांना मारहाण
सातपूर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश बळीराम शिरसाठ यास ताब्यात घेतले होते. पोलिस तपासात त्याने अनेक घरफोड्यांची कबुली देत चोरीचा माल खरेदी करणा-यांकडून काढून देतो असे सांगितल्याने पोलिस ८ फेब्रुवारी २०१८ रोजी संशयितांच्या घरी धडकले असता ही घटना घडली होती. पोलिसांनी आनंदा उर्फ अनिल पालवे यास ताब्यात घेताच त्याच्या अंगझडतीत धारदार चाकू मिळून आला होता. पोलिस त्यास घेऊन घराबाहेर पडले असता पालवे कुटुंबियांनी गोंधळ घालत पोलिस कर्मचा-यांना मारहाण केली. रामदास पालवे याने पोलिसांनी ताब्यात घेतलेला भाऊ आनंद याची कशीबशी सुटका करून घेत त्यास खाली पाडून त्याच्या मानेवर पाय ठेवला. यावेळी त्याने आता तू मरच तू मेला तर पोलिसांनी तुला मारले असे मी सांगेन असे म्हणत गोंधळ घातला.
पोलिस वाहनावर हल्ला, शिवीगाळ व धक्काबुक्की
यावेळी अन्य सदस्यांनीही पोलिसांना विरोध करीत धक्काबुक्की व मारहाण करीत शासकिय कामात अडथळा आणला. तर सोनी पालवे व वेणूबाई पालवे यांनी गोंगाट निर्माण करून महिला उपनिरीक्षक यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच दिपक अहिरे याने हवालदार डी.के.पवार यांच्या पोटात बुक्का मारून शिवीगाळ केली. या घटनेत कसेबसे सावरलेल्या पोलिसांनी चाकू बाळगणा-या संशयितास ताब्यात घेऊन पोलिस ठाणेत घेवून जात असतांना या कुटुंबियांनी गैर कायद्याची गर्दी जमवून पोलिस वाहनावरही हल्ला केला होता.
Eight members of the same family were sentenced to three months imprisonment by the court
Nashik Crime District Court Police Attack 8 Family Members Punishment
City Satpur