नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली गावात शिवजयंतीच्या बैठकीत झालेला राडा आणि गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आणकी काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये तुफान राडा झाला होता. यावेळी हवेत गोळीबारही झाला. याप्रकरणी शिंदे गटाचे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचे चिरंजीव स्वप्निल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणी माजी नगरसेवक अस्लम ऊर्फ भय्या मणियार आणि सराईत गुन्हेगार प्रशांत जाधव, सागर कोकणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली गावातील राडा आणि गोळीबार प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एक पिस्तूल आणि माजी नगरसेवकाच्या मुलाला अटकही केली आहे. दोन्ही गटाकडून तक्रारी देण्यात आल्या असून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये शिवजयंतीच्या बैठकीला उपस्थतीत असलेल्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला असून एकच पिस्तूल ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या या राड्यात शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळाले आहे.
शिंदे गटाची स्वतंत्र शिवजयंती साजरी केली जाईल पण त्यास सर्वपक्षीय म्हणू नका असे बोलून दोन्ही गटात वाद झाला यामध्ये गोळीबार झाल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. तर गुन्ह्यातील काही आरोपी फरार आहे. त्यासाठी नाशिक शहर पोलीस दलातील पथके त्यांच्या मागावर असून मुंबई नाका पोलीसांच्या पथकाकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे. दरम्यान शिदे आणि ठाकरे गटात झालेला हा राडा अधिकच टोकाला गेला आहे. दोन्ही कडून आरोप केले जात असतांना पोलीसांच्या तपासात काय निष्पन्न होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
जेलरोडला पिस्तुल विक्री करणारा अटकेत
जेलरोड भागात पिस्तूल विक्रीसाठी आलेला विक्रेता पोलिसांच्या हाती लागला असून, त्याच्या ताब्यातून सुमारे ३१ हजार रूपये किमतीचा पिस्तूल सह जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईने शहरातील बेकायदा पिस्तूल खरेदी विक्री व्यवसाय पुन्हा एकदा चर्चेत आला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात विना परवाना अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने केली.
नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहिल अमजद पठाण (१९ रा.नुरीया सुन्नी मस्जीद समोर पवारवाडी,सुभाषरोड) असे पिस्तूल विक्री प्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव असून प्रशांत उर्फ डुमा बागुल या त्याच्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे शिपाई स्वप्निल जुंद्रे यांनी तक्रार दाखल केली आहे. जेलरोड येथील साईबाबा मंदिर भागात शनिवारी रात्री पिस्तूल विक्रीसाठी एक तरूण येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वसंत विहार भागात सापळा लावण्यात आला होता.
खबऱ्याने दिलेल्या वर्णनानुसार संशयित समर्थ अपार्टमेंट समोरील रोडवर येताच सापळा लावलेल्या पोलिसांनी त्यास पकडून बेड्या ठोकल्या. संशयिताच्या अंगझडतीत सुमारे ३० हजार ५०० रूपये किमतीचे देशी बनावटचे पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस मिळून आले असून पोलिस तपासात दुसरा संशयित डुमा बागुल याने विक्रीसाठी पठाणच्या स्वाधिन पिस्तूल केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दोघा पिस्तूलधारींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसºया संशयिताचा शोध पोलिस घेत आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक काकड करीत आहेत.
Nashik Crime Deolali Firing Fir Registered