अंबड एमआयडीसीत चोरी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीतील कारखान्याचा पत्रा उचकटून चोरट्यांनी ९० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात लोखंडी जॉब पार्ट,लाईनर आणि इलेक्ट्रीक ग्राईंडरचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीष निवृत्ती शिंदे (रा.श्रीजयनगर,वडाळा पाथर्डी रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. शिंदे औद्योगीक वसाहतीतील साई कृपा अॅटोकॉम या कारखान्याचे काम बघतात. गेल्या शनिवारी (दि.९) कारखाना साप्ताहीक सुट्टीनिमित्त बंद असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद कारखान्याच्या पाठीमागील बाजूस लावलेल्या पत्रा वाकवून ही चोरी केली. कंपनीत शिरलेल्या चोरट्यांनी लोखंडी जॉब पार्ट,लोखंडी लाईनर व इलेक्ट्रीक ग्राईंडर असा सुमारे ८७ हजार ९३७ रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
देवळाली कॅम्पला घरफोडी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लष्कराच्या आर्टीलरी सेंटर येथील वसाहतीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे तीन लाखांच्या दागिण्यांवर डल्ला मारला. या घटनेने पुन्हा एकदा लष्करी छावणीचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य दिनकर ठोंबरे (रा.कॉर्टर न.३९ / ५ आर्टिलरी सेंटर,वडनेरगेट) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ठोंबरे कुटूंबिय गेल्या रविवारी (दि.१०) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सुमारे ३ लाख ९ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.