नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेले नाशिककर परतू लागल्याने घरफोड्यांच्या घटना उघडकीस येवू लागल्या असून वेगवेगळ्या भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे १५ लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. तर आडगाव शिवारातील वृंदावन नगर भागात भरदिवसा घरफोडण्यात आले मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. तिन्ही घटनांप्रकरणी पंचवटी, आडगाव आणि अंबड पोलिस ठाण्यात घरफोडींंचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हिरावाडीतील विष्णू माधव केदार (रा.उत्तम अपा.लाटेनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार केदार कुटूंबिय शनिवारी (दि.२९) अल्पावधीच्या कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे लॉक तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली ४० हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक मोरे करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोतील कामटवाडा भागात घडली. राजेश जगन्नाथ गायकर (रा.लक्ष्मीनगर,सायखेडकर हॉस्पिटल मागे) यांनी तक्रार दाखल केली आहे. गायकर कुटूंबिय शनिवारी (दि.२९) नांदगाव येथे कामानिमित्त गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी गायकर यांच्या बंद घराच्या खिडकीचे लोखंडी गज कापून घरात प्रवेश केला व बेडरूममधील लोखंडी कपाटातील ३ लाखाची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १३ लाख ९८ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.
आडगाव शिवारातील वृंदावननगर भागात गेल्या शुक्रवारी (दि.२१) भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न झाला. कुंदन विजय ठाकरे (रा.प्रगती सोसा.शिवकृपा स्विट मागे) यांनी तक्रार दाखल केली आहे. ठाकरे कुटूंबिय दुपारच्या सुमारास अल्पावधीच्या कामासाठी घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. घरात शिरलेल्या चोरट्यांच्या हाती काही न लागल्याने त्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकले होते. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
Nashik Crime Dacoity Diwali Vacation Police