नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ४० वर्षीय व्यक्तीला तब्बल १६ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्क फॉर्म होमच्या शोधात असताना चांगला परताव्याचे आमिष दाखवून सायबर भामट्याने ही फसवणूक केली. याप्रकरणी भूषण पांडुरंग राजपूत (४०, रा. अमृता हाईटस्, उत्तमनगर, सिडको) यांनी तक्रार दिली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजपूत वर्क फॉर्म होमच्या शोधात होते. जून महिन्यात ९९५०८९७९९९ या क्रमाकांवरून फोन आला. सायबर भामट्याने त्यांना वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखविले. त्यासाठी टेलिग्रामवर दिलेले टास्क पूर्ण करण्यासाठीचे काम दिले. राजपूत यांनी ऑनलाइन टास्क पूर्ण केले. टास्क पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला काही प्रमाणात पैशांचा परतावाही मिळाला. त्यानंतर यांची टास्क पूर्ण केल्याची रक्कम त्यांच्या डॅशबोर्डवर दिसू लागली. ठराविक दिवसांनी सदर रक्कम काढता येईल, असे संशयिताने सांगितले. हा प्रकार ७ जून ते १० जुलै या दरम्यान घडला आहे. आतापर्यंत राजपूत यांनी १६ लाख ३ हजार २१० रुपये जमा केले. त्यानंतर संशयिताकडून पैशांची मागणी सुरू राहिल्याने त्यांना संशय आला. त्यानंतर पोलिस स्थानकात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.
जावई सासुरवाडीला, चोरटे घरात… घरफोडीत ४० हजाराचा ऐवज लंपास
अधिक मासाचे वाण घेण्यासाठी सासुरवाडीला जाणे एका जावयाला चांगलेच महागात पडले आहे. जावई सासुरवाडीला जाताच चोरट्यांनी घर फोडून ४० हजाराचा ऐवज लंपास केला. धोंड्याच्या महिन्यात जावई सासुरवाडीला जातात. त्यावेळेस घरात कोणी नाही याची संधी साधत चोरट्यांनी ही चोरी केली. येवला तालुक्यातील पारेगाव रोडवरील नव्याने बांधकाम झालेल्या घरात चोरट्यांनी ही चोरी केली.
सुनील तुकाराम पोटे असे या जावयाचे नाव आहे. पोटे हे चांदवड येथील सासूरवाडी येथे गेले होते. चोरट्यांनी मंगळवार ते बुधवारच्या मध्यरात्री त्यांच्या बंद घराचा कडीकोंयडा तोडून घरात प्रवेश केला व मौल्यवान साहित्य लंपास केले. दुसऱ्या दिवशी दूध देण्यासाठी आलेले शिवाजी काळे यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी घरमालकांना फोन करून चोरीबाबत माहिती दिली. या घरातून चोरट्यांनी व्हिडिओकॉन कंपनीचा एलईडी टीव्ही, चांदीचे २५ भाराचे पाच देव, चांदीची दहा भाराची महालक्ष्मी देवीची मूर्ती, सहा भाराच्या चांदीच्या पादुका, दोन भाराचा कळस, तसेच २४ हजार रुपयांच्या नोटा व पाचशे रुपयांचे नाणे, असा ३९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी तातडीने घटनस्थळी धाव घेत ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करून गुन्हा नोंदवून चोरीचा तपास सुरू केला आहे. पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पगार तपास करीत आहेत.
After breaking into the house, the thief exchanged 40,000 for loot A 40-year-old man was robbed of Rs. 16 lakhs Nashik Crime Cyber Theft Robbery Work From Home Yeola District City