नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याने ती चार महिन्यांची गर्भधारणा झाल्याप्रकरणी एका नातेवाईकास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना सन.२०२० मध्ये अरिंगळे मळा भागात उघडकीस आली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असिफ अली अशरफअली सय्यद (३०) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने सन.२०२० मध्ये घरात कुणी नसल्याची संधी साधत वेळोवेळी आपल्या नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. यातून ती चार महिन्यांची गर्भवती झाली होती. हा प्रकार ९ एप्रिल २०२० रोजी समोर आला होता. याप्रकरणी मुलीच्या कुटूंबियांनी पोलिसात धाव घेतल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक एम.बी.राऊत यांनी करून पुराव्यानिशी न्यायालय दोषारोपपत्र सादर केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय क्र.२ च्या न्या. अे.यू. कदम यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अॅड. दिपशिखा भिडे यांनी सात साक्षीदार तपासले असता न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार,पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस जन्मठेप व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
Nashik Crime Court Rape Punishment