नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची परस्पर विक्री केल्याप्रकरणी दोघांना १ वर्षे ९ महिने २६ दिवसांचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सनु उर्फ सोना राजू वाकेकर (३०, रा. संभाजी चौक, आडगाव, मुळ रा. जालना) व राजू उर्फ अमर छगन वाकेकर (४२, रा. आडगाव) अशी शिक्षा सुनावलेल्या दोघांची नावे आहेत.
आडगाव पोलिस ठाण्यात डिसेंबर २०१७ मध्ये हा गुन्हा दाखल झाला होता. आरोपी सनु वराजू वाकेकर यांनी आडगावमधील १७ वर्षीय मुलीचे अपहरण केले. दोघांनी मिळून अपहृत मुलीस संशयित सौतान फत्तेसिंग गुंदिया व फत्तेसिंग गुंदिया यांच्या ताब्यात दिली. त्यातील फत्तेसिंग याने पीडितेचे लग्न सौतान सोबत लावून दिले. सौतानने पीडितेवर अत्याचार केले. त्यानंतर त्याने पीडितेची महिलेसह इतर दोघांना विक्री करीत तिचे लग्न लावून दिले. त्यातील एकाने पीडितेवर अत्याचार केला.
याप्रकरणी आरोपींविरोधात अपहरण, बलात्कार, पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी वाकेकर यांना अटक केली, तर इतर संशयित फरार असून फत्तेसिंग याचा मृत्यू झाला आहे. तत्कालीन उपनिरीक्षक चांदणी पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अॅड. अर्पणा पाटील व एस. एस. गोरे यांनी युक्तीवाद केला. त्यानुसार सनु उर्फ सोना वाकेकर व राजू वाकेकर यांना अपहरण केल्याप्रकरणी विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. खरात यांनी शिक्षा सुनावली आहे.