नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विवाहीतेचा मानसिक व शारिरीक छळ करून स्त्रीधन काढून घेतल्या प्रकरणी पतीसह सासरच्या तीन जणांना न्यायालयाने सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. राहूल अशोक यादव (२९), अशोक दामोधर यादव (५४), आशा अशोक यादव (४८) व विपुल अशोक यादव (२६ रा. सर्व संगमनेर, जि. अहमदनगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
ही घटना संगमनेर जि.अहमदनगर येथे घडली होती. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला नाशिकरोड येथील प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्या.शर्वरी जोशी यांच्या कोर्टात चालला. शहरातील पीडितेचा राहूल यादव याच्याशी विवाह झाला होता. २२ मार्च २०१४ ते ४ एप्रिल २०१५ दरम्यान संशयितांनी किरकोळ कारणावरून वाद घालत विवाहीतेस शिवीगाळ व दमदाटी केली. याच काळात नवीन सदनिका घेण्यासाठी माहेरून दहा लाख रूपये आणावेत अशी मागणी केली. मात्र विवाहीतेने पैसे आणण्यास नकार दिल्याने आरोपींनी तिचा शारिरीक व मानसिक छळ करून लग्नातील अंगावरील स्त्रीधन काढून घेतले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक ए.ए.येवला यांनी केला. हा खटला नाशिकरोड येथील प्रथम वर्ग न्यायालयात चालला. सरकारतर्फे अॅड एस.पी.घोडेस्वार यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार,पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेल्या परिस्थीजन्य पुराव्यास अनुसरून वरील चौघांना भादवी कलम ४९८ (अ) ३४ अन्वये सहा महिने साधा कारावास व प्रत्येकी तीन हजार रूपये दंडाची शिक्षा तसेच भादवी कलम ३२३ अन्वये एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.