नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा व सत्र न्यायालयाने मायलेकींना मारहाण करीत मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास दोन वर्ष तर दोघांना दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. बालाजी अर्जुन शिनगारे (३४ रा. कुलस्वामिनी अपा. सिध्देश्वरनगर, जेलरोड), प्रफुल्ल विलास शिंदे (२७ रा.नाईकनगर देवळाई, औरंगाबाद) व प्राजक्ता विलास शिंदे उर्फ प्राजक्ता बालाजी शिनगारे (२८ रा.कुलस्वामिनी अपा. सिध्देश्वरनगर, जेलरोड) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील बालाजी शिनगारे यास दोन वर्षांचा सश्रम कारावास तर उर्वरीत दोघांना दोन महिने साधा कारावास व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ही घटना १५ सप्टेंबर २०१३ मध्ये जिल्हापरिषद परिसरातील वरटी कॉलनी भागात घडली होती. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात विनयभंगासह मारहाण, सार्वजनिक ठिकाणी पाळावयाची सभ्यता तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला प्रथम वर्ग न्यायालय,कोर्ट क्र.२ चे न्या. कैलास चाफळे यांच्या कोर्टात चालला.
आरोपींनी १५ सप्टेंबर २०१३ रोजी रात्री वरटी कॉलनी भागात राहणा-या मायलेकींचे घर गाठून बेकायदा प्रवेश केला होता. आरोपी बालाजी शिनगारे याने मुलीच्या आईस तुमच्या मुलीवर माझे प्रेम आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला असता पिडीत महिलेने त्यास समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त शिनगारे याने महिलेस शिवीगाळ व मारहाण करून जखमी केले. तसेच मुलीशी फोनवर अश्लिल संभाषण करून तिचा विनयभंग केला. याप्रसंगी उर्वरीत दोघांनी मायलेकींना जीवे मारण्याची धमकी देत मुलीस शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात विनयभंग,मारहाण, सार्वजनिक ठिकाणी पाळावयाची सभ्यता आदी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक एम.एम.नाईक यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप कोर्टात सादर केले. हा खटना प्रथम वर्ग न्यायालयात चालला. सरकारतर्फे अॅड.संध्या वाघचौरे यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी साक्षीदार,पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिकाºयांनी सादर केलेले परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून न्यायालयाने आरोपी बालाजी शिनगारे यास विनयभंगाच्या गुन्ह्यात दोन वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली तर उर्वरीत दोघांना भादवी कलम ४५२ अन्वये दोन महिने साधा कारावास आणि प्रत्येकी दोन हजार तसेत भादवी कलम ३२३,३४ अन्वये तिघांना एक महिना साधा कारावास व प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.