नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील आणि दानपेटीतील रोकडसह पंखे चोरणाऱ्या चोरट्यास न्यायालयाने दोन वर्ष तीन महिन्यांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना लॅमरोड भागात घडली होती. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अजय राजू वाघेला (२२ रा.शिंदेगाव) असे शिक्षा सुनावम्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विष्णू संतू खताळे (रा.कलापूर्णम मंदिराजवळ,बालगृहरोड लॅमरोड) यांनी तक्रार दाखल केली होती. खताळे २६ मार्च २०२० रोजी बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे स्टोअररूमचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. या घटनेत चोरट्यांनी कपाटातील काळ््या बॅगेत ठेवलेले १० हजार रूपये दानपेटीतील एक हजार रूपये आणि महत्वाची कागदपत्र चोरून नेला होता. याप्रकरणी संशयित प्रकाश सोमनाथ बुटिया आणि अजय राजू वाघेला या आरोपीविरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
देवळाली कॅम्पचे तत्कालिन जमादार बी.पी.हांडोरे यांनी या गुह्याचा तपास करून आरोपींविरोधात पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला नाशिकरोड सह न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस.एस.देशमुख यांच्या कोर्टात चालला. सरकारपक्षाच्या वतीने अॅड.पी.एस.सपकाळे यांनी काम पाहिले. फिर्यादी,साक्षीदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून न्यायालयाने आरोपी अजय वाघेला यास सीआरपीसी कलम २४८ (२) अन्वये दोषी ठरवत त्यास दोन वर्ष तीन महिन्यांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास पंधरा दिवस अतिरिक्त कारावासाबाबत निकालपत्रात नमुद करण्यात आले आहे