नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरातील गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ झाली असून ती रोखण्यात नाशिक पोलिसांना पूर्णतः अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. खुन, मारामाऱ्या, चोरी हे सारेच प्रकार बोकाळले आहेत. आता तर कंपनीच्या एका मॅनेजरची हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे नाशकात गुन्हेगारांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचे दिसून येत आहे.
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश मोगरे (वय ३९, रा. कालीबेरी सोसायटी, इंदिरानगर) हे अंबड औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी (२३ मार्च) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते कंपनीतील काम आटोपून आपल्या कारने घरी जात होते. पाथर्डी फाट्याजवळील हॉटेल अंगण व फाळके स्मारकासमोर ते आले. त्याचवेळी ज्ञात व्यक्तीने त्यांची कार अडविली. तसेच, या अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्रांनी मोगरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोरांनी जखमी मोगरे यांची कार घेऊन पलायन केले.
या प्राणघातक हल्ल्याची माहिती इंदिरानगर पोलीस स्टेशनला कळताच पोलीस निरीक्षक भांबळे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहिले की मोगरे हे हल्ल्यात जबर जखमी झाले आहेत. पोलिसांनी तत्काळ मोगरे यांना औषधोपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच मोगरे यांचे आज सकाळी आठ वाजता निधन झाले. त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त खांडवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस पथकास तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. रात्रीच्या अंधारात हल्ला करून पसार झालेल्या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध तीन पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके तपासासाठी रवाना झाली आहेत. गेल्या काही दिवसात शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने नाशिककर दहशतीच्या छायेखाली आहेत.
Nashik Crime Company Manager Murder Police Challenge