नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका कंपनीच्या वाहनचालकानेच वाहनाच्या इंधनावर डल्ला मारल्याचे प्रकरण समोर आले आहे. तब्बल २६ हजार रुपयांचे इंधन चोरीप्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास निवृत्ती रहाडे (३५ रा. दहेगाव, वाडिवऱ्हे) असे संशयीत चालकाचे नाव आहे. याप्रकरणी किशोर ठाकरे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयीत अंबड औद्योगीक वसाहतीतील सिटीआर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज या कारखान्यातील चालक आहे. त्याने गेल्या काही दिवसात कंपनीच्या विविध वाहनांमधून सुमारे २६ हजार रूपये किमतीचे २६० लिटर इंधन परस्पर काढून घेत अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार गेल्या १३ डिसेंबर रोजी उघडकीस आला असून, अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.
विहीतगावला एकाची आत्महत्या
विहीतगाव येथील ३२ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुमित जयवंत गवळी (रा.बुध्दविहार,विहीतगाव) असे आत्महत्या करणाºया इसमाचे नाव आहे. गवळी यांनी शनिवारी (दि.१५) अज्ञात कारणातून प्राईड एव्हीन्युव या सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर लोखंडी ग्रीलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याबाबत अमित गवळी यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.