नाशिक – लेखापाल महिलेने पगार घोटाळा केला असून, तिने सोडून गेलेल्या कर्मचारांच्या नावे पगार काढत तब्बल साडे सतरा लाखाचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या चेकर व मेकर लॉगईन आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून हा घोटाळा करण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेत्रांजली सागर वानखेडे (३० रा.पवननगर,सिडको) असे संशयीत महिलेचे नाव आहे. योगेश पोपट अनर्थे (रा.अंबड लिंकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. शरणपूररोडवरील महालसा अॅण्ड महल्सा कंपनीत हा घोटाळा झाला. सदर महिला वरिल कंपनीच्या फर्म कार्यालयात लेखापाल या पदावर कार्यरत असतांना तीने हा घोटाळा केला. कार्यालयीन कामकाजासाठी पुरविण्यात आलेल्या चेकर व मेकर लॉगईन आयडी व पासवर्डचा तिने बेकायदेशीर वापर करून हे कृत्य केल्याचे म्हटले आहे.
फर्मचे आर्थिक नुकसान व्हावे व स्व:ताचा फायदा व्हावा या हेतूने तिने फर्मच्या विविध शाखेतून नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव पगार रकमा दाखवून अपहार केल्या. फर्मच्या थत्तेनगर येथील कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यातून तिने १७ लाख ५० हजार ०२४ रूपयांची रक्कम वेळोवेळी स्व:ताच्या खात्यात वर्ग केल्याचे समोर आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काकवीपुरे करीत आहेत.