नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून नाशिक पोलिस ही गुन्हेगारी रोखण्यात सपशेल अपयशी ठरत आहेत. आजही सकाळच्या सुमारास सिडकोमध्ये भरचौकात गोळीबार झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या सर्व परिस्थितीची दखल पालकमंत्री आणि राज्य सरकार घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सिडकोतील बाजी प्रभू चौकात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक गोळीबार झाला. एका टोळीने राकेश कोष्टी या सराईत गुन्हेगारावर गोळीबार केला. या घटनेत राकेश कोष्टी हा जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे…
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याचे सराईत गुन्हेगार जया दिवे, किरण शेळके, ठाकूर यांच्याशी जुने वाद आहेत. या वादातूनच कोष्टीवर आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सिडकोतील बाजीप्रभू चौकात गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात २ गोळ्या कोष्टीच्या कमरेत शिरल्या आहेत. त्यामुळे तो जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या आणि भरवस्तीत झालेल्या या घटनेमुळे नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. पोलिसांनी जया दिवे याला ताब्यात घेतले आहे. तर, त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. गोळीबाराची घटना समजताच उपायुक्त चंद्रकांत खांडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे त्वरित फिरवत जया दिवेला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तपास पथक तयार करण्यात आले आहे. संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.
Nashik Crime Cidco Firing 1 Injured